बुधवार, ९ मे, २०१८

संत तुकारामांचा एक अभंग....

संत तुकोबांचा उपदेश

ऐसें संत जाले कळी ।
तोंडीं तमाखूची नळी ।।१।।
स्नानसंध्या बुडविली ।
पुढें भांग वोडवली ।।ध्रु.।।
भांगभुर्का हें साधन ।*
पची पडे मद्यपान ।।२।।
तुका म्हणे अवघे सोंग ।
तेथें कैचा पांडुरंग? ।।३।।

अर्थ व चिंतन -
अभंगाचं चिंतन वाचताना कुंभमेळ्यातले साधू डोळ्यासमोर आणून वाचा. तुकोबांच्याही काळात कुंभमेळे झालेत. त्यांना त्यात चाललेला व्यसनांचा बाजार मान्य नव्हता. कुंभमेळ्यात पांडुरंग असूच शकत नाही, ही त्याची ठाम भूमिका होती. आता इथं पांडुरंग का नाही? तर, इथं वारकरी भक्त नाही, म्हणून.

कुंभमेळ्यातले साधू तर निव्वळ व्यसनी आहेत. एक नव्हे तर अनेक प्रकारच्या मादक पदार्थांचा इथं राजरोस वापर होताना तुकोबांनी पहिला. इतरही अनेकांनी हे पाहिलं, पण ते तोंड बंद ठेवून होते. तुकोबांनी या विषयाला व्यापक स्वरूप दिलं. तुकोबा बोलले म्हणून ते खास ठरतात.

पुढच्या पिढ्यांवर पश्चातापाची वेळ, वाईट लोक 'अनेक' असतात म्हणून येत नसते, तर चांगले लोक  'शांत' बसतात, म्हणून येत असते. अशावेळी 'बोलणारे' तुकोबा समाजातील सन्माननीय व्यक्ती ठरतात.

या व्यसनी साधूंबद्दल बोलताना तुकोबा म्हणतात, "या कलियुगात असे काही संत झालेत की ज्यांच्या तोंडात तांबाकूने भरलेली चिलीम असते."

अनेक दिवस अंघोळीचा पत्ता नाही. "स्नानसंध्या तर बुडवलीच पण (चोवीस तास नशेत राहण्यासाठी) आपल्या पुढं भांग वाढून ठेवतात." आणि ती पीत राहतात, पीत राहतात.

लोकांच्या भक्तीची काही साधने असतात. नामस्मरण, चिंतन इत्यादी. पण या साधूंचं "भांग पिणे आणि चरस वगैरे सारख्या पदार्थाची भुकटी ओढणे, ही साधने आहेत. आणि (दारू तर कितीही प्या, चढतंच नाही.) दारू पिणे हे तर जणू यांच्या पचनी पडलेलं आहे."

म्हणून तुकोबा शेवटी म्हणतात, "हे सगळं निव्वळ सोंग आहे. आणि अशा सोंगाच्या ठिकाणी पांडुरंग कसा बरं असेल?"

तुकोबा म्हणतात, कुंभमेळ्यात पांडुरंग नाही. अहो, पांडुरंग तर पंढरपूरला. मग अशावेळी साहजिकच प्रश्न पडतो, वारकऱ्यांचं कुंभमेळ्यात काय काम?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.