गुरुवार, १ मे, २०२५

शालेय गुणवत्ता आणि शिक्षकांची अशैक्षणिक कामे...

अशैक्षणिक कामे.

         भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण व्यवस्था ही सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातही ग्रामीण भागातील सरकारी शाळा म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातला कणा आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून त्यांना विविध अशैक्षणिक कामांचीही जबाबदारी पार पाडावी लागते. हाच मुद्दा शालेय गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरतो.
            आजकाल सरकारी शाळेतील कमी होत असलेली विद्यार्थी संख्या चर्चेचा विषय होत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी शाळेतील घसरत चाललेली गुणवत्ता आहे.असे जो तो ओरडून ओरडून सांगताना दिसत आहे.परंतु या परिस्थितीला कोण जबाबदार आहे यावर कोणीही बोलायला तयार नाही.यासाठी शिक्षकाला जबाबदार धरून सगळे मोकळे होत आहे.सरकारी शाळेतील या दुरावस्थेला अनेक घटक जबाबदार आहेत.त्यातील महत्वाचा घटक म्हणजे शिक्षकांना करावी लागत असलेली अशैक्षणिक कामे.या अशैक्षणिक कामामुळे सरकारी शाळेतील शिक्षक अक्षरशः शालाबाह्य होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी लवकरच शासनाला शाळाबाह्य शिक्षक शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान राबविण्याची वेळ आलेली आहे.
          भारतातील सरकारी शाळा या शिक्षण व्यवस्थेचा कणा मानल्या जातात, जिथे सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. मात्र, या शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक कार्याबरोबरच अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात, ज्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. या लेखात आपण सरकारी शाळेतील शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचे स्वरूप, त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम आणि यावर उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेऊ.
अशैक्षणिक कामांचे स्वरूप.
          सरकारी शाळेतील शिक्षकांना शिकवण्याबरोबरच विविध प्रशासकीय,राष्ट्रीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामध्ये खालील कामांचा समावेश होतो.
A)प्रशासकीय कामे.
1)दररोज विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदणी करणे.
2)अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना घरी जाऊन भेट देणे.पालक व विद्यार्थ्याला नियमित उपस्थितीचे महत्व पटून देणे.
3)विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, 
4)उपस्थिती अहवाल तयार करणे.
5)शाळेचे अहवाल online करणे.
6)शालाबाह्य मुलांचा शोध घेणे आणि त्यांचा शाळेत समावेश करणे.
7)शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करणे. ते प्रस्ताव वेगवेगळ्या वेबसाइड वर ऑनलाईन करणे.
8) विविध शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी व पालक यांचे बँकेत खाते उघडणे. व विद्यार्थ्यांच्या खात्यांत पैसे पाठवण्यासाठी माहिती संकलन करणे.
9)गणवेश कापड खरेदी करून गणवेश शिलाई करून घेणे.गणवेश शिलाईसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे माप घेणे. गणवेश वाटप करणे.गणवेश वाटपाच्या नोंदी ठेवणे.
10)शाळेच्या देखभाल आणि दुरुस्तीशी संबंधित कामे करणे.
11) शाळेच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवणे, आर्थिक अभिलेखे तयार करणे.हे अभिलेखे ऑडिट साठी उपलब्ध करून देणे.
12) नवीन वर्गखोल्या,किचनशेड,आवर्भिंत, स्वच्छता गृह,छताचे पाणी संकलन इत्यादी बांधकाम करणे.
13)वर्गखोल्या व शालेय परिसराची दररोज स्वच्छता करून घेणे.
14) प्रत्येक तासिका,लघु मध्यंतर,दीर्घ मध्यंतर,शाळा भरणे,शाळा सुटणे,परिपाठ घेणे या वेळांवर घंटा वाजविणे.
15) आरोग्य तपासणी करून घेणे.
16) शाळेच्या इमारतींचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार कराणे.
17)स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करणे.
B)निवडणूक संबंधित कामे.
1)मतदार यादी तयार करणे आणि या यादीचे सतत पुनरावलोक करणे.
2)मतदान केंद्रावर कर्मचारी म्हणून काम करणे. (PO/ APO/ BLO)
3)निवडणुकीसाठी प्रशिक्षणात भाग घेणे.
4)मतदान केंद्र सजावट व व्यवस्था करणे.फर्निचर उपलब्ध करून देणे.
5) पोलचीट चे घरोघरी जाऊन वाटप करणे.
6) मतदार जनजागृती साठी शाळेत विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करणे.व शाळेत मतदार दिन साजरा करणे.
7)नवमतदारांची घरोघरी जाऊन नोंदणी करणे.
8) नवमतदारांची नोंदणी, नावात दुरुस्त व आधार कार्ड संलग्न करणे इत्यादी फॉर्म भरणे. व ही सर्व फॉर्म ऑनलाईन करणे.
9)मतदार यादीत नाव येणे,नावात दुरुस्ती करणे नवीन मतदान कार्डाची मागणी करणे इत्यादी ऑनलाईन अर्ज केलेल्या मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करणे.
10)पडताळणी केलेले फॉर्म ऑनलाईन तहसील कार्याकडे पाठवणे.
11)गावातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचा घरोघरी जाऊन शोध घेऊन मतदार यादीत नोंद घेणे. व तो अहवाल तहसील कार्यालयास सादर करणे.
12)मयत मतदार, दुबार मतदार व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून वगळणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे.
13) तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी आयोजित आढावा बैठकांना उपस्थित राहणे.
C)सामाजिक आणि सरकारी उपक्रम.
1)बालविवाह प्रतिबंधक कार्यवाही आणि इतर सामाजिक मोहिमांमध्ये सहभाग घेणे.
2)सरकारी योजनांचा प्रचार आणि त्याची अंमलबजावणी करणे.
3) विविध समाजसुधारक व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे.
4) विविध शास्त्रज्ञांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे.
5) विविध परमवीर चक्र प्राप्त सैनिकांची जयंती साजरी करणे.
6) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे.
7) वृक्षारोपण केलेल्या झाडांचे लोकेशन ऑनलाईन नोंदविणे.
8) शाळा सुधार योजनेअंतर्गत शाळेसाठी लोकवर्गणी व लोकसहभाग मिळविणे.
9) गावात स्वच्छता अभियान राबविणे.
10) गावात हागणदारी मुक्त अभियान राबविणे.
11) आपत्ती निवाऱ्याची कामे.
12) शाळा व शाळेचा परिसर तंबाखू मुक्त करणे.
13)शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करणे.
14)स्थानिक पंचायत किंवा सरकारी संस्थांशी समन्वय साधणे.
15) गावातील ग्रामसभांना उपस्थित राहून शाळेच्या संबंधित अहवाल सादर करणे.
16) गावातील ग्रामसभेचे नोडल अधिकारी म्हणून कामकाज करणे.
17) गावातील तंटामुक्त समिती सारख्या समितीवर सदस्य म्हणून कामकाज करणे.
18) विविध राष्ट्रीय दिन व विविध सप्ताह साजरे करणे.
19) जंतनाशक गोळ्या, आयरन च्या गोळ्या निर्धारित वेळेवर विद्यार्थ्यांना वाटप करणे. या गोळ्यांची नोंद साठा नोंदवहीत करणे.
D)मध्यान्ह भोजन योजनेचे व्यवस्थापन करणे.
1)शासन स्तरावरून प्राप्त शालेय पोषण आहाराचे साहित्य मोजमाप करून स्वीकारणे.
2)शासन स्तरावरून स्वीकारलेले साहित्याची योग्य साठवणूक व देखभाल करणे.
3)शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी इंधनाची खरेदी करणे व योग्य निगा ठेवणे.
4)पोषण आहारामध्ये टाकण्यासाठी भाजीपाल्याची खरेदी करणे.
5)पोषण आहारासोबत देण्यासाठी विविध नट्स,अंडी, केळी व बिस्कीट सारख्या पूरक आहाराची खरेदी करणे.
6) दररोज पोषण आहार देण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती व लाभार्थ्याची नोंद घेणे.
7)लाभार्थीं संख्येच्या प्रमाणात पोषण आहाराचे साहित्य व भाजीपाला योग्य प्रमाणात मोजून देणे.
8) पोषण आहार शिजवितांना देखरेख ठेवणे.विषबाधा होऊ नये याची काळजी घेणे.
9) पोषण आहार वाटप करण्यापूर्वी चव घेऊ आहार दर्जेदार,चवदार व सेवन करण्यायोग्य असल्याची खात्री करणे.
8) पोषण आहारासोबत पूरक आहाराचे योग्य प्रमाणात वाटप करणे.
9) शालेय पोषण आहाराचे तांदूळ, धन्यादी साहित्य, तेल,मीठ,मसाला सारखे इतर साहित्य, पूरक साहित्य खर्च व उरलेल्या साहित्याची नोंद शालेय पोषण आहार नोंदवहीत नियमित करणे.
10) शालेय पोषण आहाराचा दैनंदिन अहवाल तयार करणे व नोंदवहीत नोंद घेणे.
11) शालेय पोषण आहाराचा दैनंदिन अहवाल न चुकता दररोज mdm portal वर online करणे.
10) शालेय पोषण आहारासंबंधी साहित्यसंबंधी  मासिक अहवाल तयार करणे.
11) शालेय पोषण आहाराचा मासिक, त्रैमासिक व वार्षिक ताळमेळ जुळविणे.
12) शालेय पोषण आहाराचा मासिक, त्रैमासिक व वार्षिक अहवाल तयार करणे.
13) शालेय पोषण आहाराचे मासिक, त्रैमासिक व वार्षिक अहवाल mam portal वर online सादर करणे.
14) शाळेतील प्रतीक विद्यार्थ्याची दर तीन महिन्यांनी वजन व उंची मोजणे. नोंदवहीत नोंद करून ठेवणे.
15)वय, वजन आणि उंची वरून प्रत्येक विद्यार्थ्याचा बॉडी मास इंडेक्स काढून नोंदवहीत नोंद घेणे.
16) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत परसबागेची निर्मिती करणे.त्यात भाजीपाला व फळ झाडांची लागवड करणे. त्यात वेळोवेळी औषध फवारणी करणे व पाणी देणे.परसबागेतील वाढलेले तण काढणे.
परसबागेची गुराधोरांपासून संरक्षण करणे.
17) शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा नोंदी ठेवणे, अभिलेखे तयार करणे, हे अभिलेखे वेळोवेळी अद्यावत करणे.वेळोवेळी होणाऱ्या ऑडिट साठी ही सर्व अभिलेखे सादर करणे.
E) शाळास्तरावरील विविध समित्यांचे कामकाज.
1) शाळा व्यवस्थापन समिती, 
2)माता पालक संघ, 
3)शिक्षक पालक संघ,
4)आपत्ती व्यवस्थापन समिती,
5) शाळा परिवहन समिती,
6) सखी सावित्री समिती,
7) शाळा बांधकाम समिती,
8) शालेय पोषण आहार योजना समिती,
9) सूचना व तक्रारपेटी समिती,
10) महिला तक्रार निवारण समिती,
11)अंतर्गत तक्रार समिती,
12) शालेय सुरक्षा समिती,
13) शाळा विकास समिती,
14)नवभारत साक्षरता समिती,
15) तंबाखू संनियंत्रण समिती,
16)SQAAF स्वयं मूल्यमापन समिती,
17) मतदार जनजागृती समिती,
18)शालाबाह्य विद्यार्थ्यासाठी गावस्तर समिती,
19)शालेय विद्यार्थी मंत्री मंडळ.
या समित्यांच्या बैठकांचे वेळोवेळी आयोजन करून बैठका घेणे.बैठकांचे अहवाल तयार करणे.बैठकीतील मंजूर ठरावानुसार योग्य ती कार्यवाही वेळेत पूर्ण करणे.
F)जनगणना व सर्वेक्षण.
1)लोकसंख्या जनगणना (Population Census) करणे.
2)सामाजिक आर्थिक सर्वेक्षण (SES) करणे.
3)आरोग्य सर्वेक्षण (Pulse Polio, TB, HIV इ.)करणे.
4)शालेय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण (शालाबाह्य, दिव्यांग विद्यार्थी, ) करणे.
5) पशू जनगणना करणे.
6) विविध लसीकरण मोहिमेत सहभाग घेणे.
7) नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे.
8) नवसाक्षरांची परीक्षा घेणे.
9) शौचालय सर्वेक्षण.
G)ऑनलाईन कामे.
1)UDISE+ डेटा एंट्री करणे.
2)School portal, Student Portal,Teacher Portal,
3)MDM portal, 
4)Shala Siddhi, 
5)Shaala Darpan,
6)SQAAF, 
7)Prematic scollership portal
पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे.
8)swift chat app वर दररोज विद्यार्थी उपस्थिती नोंदविणे.
9)swift chat app वर FLN अभियान, Pat 1, व Pat 2 चा निकाल नोंदविणे.
10) सर्व विद्यार्थ्यांचे APAR ID तयार करणे.
11) दुसऱ्या शाळेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी TC Request पाठविणे.
12) दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची Request मंजुर करणे.
13) प्रवेश व निर्गम बाबतची कार्यवाही UDise+ आणि Saral Student Portal या दोन weside वर करणे.
14) Ulhas App वर नवसाक्षरांची माहिती भरणे.
15) शाळेचे GIS मॅपिंग करणे.
16) शाळेचे तंबाखुमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अहवाल ऑनलाईन upload करणे.
15) विद्यांजली portal वर शाळेची नोंदणी करणे.
H) इतर जबाबदाऱ्या.
1)शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करणे.
2)स्थानिक पंचायत किंवा सरकारी संस्थांशी समन्वय साधणे.
3) गावातील ग्रामसभांना उपस्थित राहून शाळेच्या संबंधित अहवाल सादर करणे.
4) गावातील तंटामुक्त समिती सारख्या समितीवर सदस्य म्हणून कामकाज करणे.
अशैक्षणिक कामांचे विश्लेषण.
शिक्षकाला शिक्षकाच्या भूमिकेसह शिपाई, स्वयंपाकी, बांधकाम कामगार, सर्वेक्षक, स्वच्छता कामगार,शिलाई कामगार, शेतकरी, निवडणूक अधिकारी,मतदान नोंदणी अधिकारी,आरोग्य सेवक, जनगणना अधिकारी इत्यादी भूमिका कराव्या लागतात.
            सर्व अशैक्षणिक कामे ही नकारात्मक नाहीत. काही कामे, जसे की शालाबाह्य मुलांचा शोध घेणे, पटनोंदणी व नियमित उपस्थिती साठी सतत पालक संपर्क करणे किंवा सामाजिक योजनांचा प्रचार, ही शिक्षणाशी संबंधित असतात आणि दीर्घकालीन फायदे देऊ शकतात. तथापि, ही कामे शिक्षकांऐवजी प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपवली जाऊ शकतात. अशैक्षणिक कामांबाबत स्पष्ट धोरण असावे आणि कोणती कामे खरोखर अशैक्षणिक आहेत याचा विचार करावा.
         अशैक्षणिक कामांचा सरकारी शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेवर खालीलप्रमाणे परिणाम होतो.
1)अध्यापनावर होणारे परिणाम.
शिक्षक हे शिक्षणाचे मूळ स्तंभ असतात. जेव्हा त्यांच्यावर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढतो, तेव्हा त्या कामांमुळे त्यांच्या अध्यापनावर थेट परिणाम होतो.
A) शिक्षकांची वर्गातील उपस्थिती नियमित राहात नाही.
B) विद्यार्थी अनुपस्थितीचे प्रमाण वाढते.
C)धड्यांचे नियोजन आणि अध्यापनात व्यत्यय येतो.
D)विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे अशक्य होते.
E)सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन करण्यात अडथळा येतो.
F)उपक्रमशील आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणास वेळ मिळत नाही.
G)विद्यार्थ्याचा प्राप्त क्षमता व अध्ययन निष्पत्तीचे दृढीकरण व सराव करून घेण्यास शिक्षकांना वेळ कमी मिळतो. 
H) विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे व तपासण्यासाठी वेळ कमी पडतो.
H) या कामांमुळे शिक्षकांचा शिकवण्यासाठी उपलब्ध वेळ आणि ऊर्जा लक्षणीयरीत्या कमी होते.
2)शिक्षकांचे मनोबल खालावणे.
A)अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षकांमध्ये निराशा येऊ शकते. यामुळे शिक्षकांचे मनोबल आणि प्रेरणा कमी होण्याची शक्यता आहे.
B)सततच्या धावपळ व तणावामुळे शिक्षकांचा शिकवण्यातील उत्साह आणि सर्जनशीलता कमी होते.
3)शिक्षकांवर होणारा मानसिक ताण.
         अध्यापन हेच पूर्णवेळ जबाबदारीचे काम आहे. त्यात इतर अतिरिक्त जबाबदाऱ्या आल्याने शिक्षक मानसिकदृष्ट्या थकतो, अकार्यक्षम होतो, किंवा कामातून असमाधानी होतो. परिणामी त्याचा तोल बिघडतो आणि त्याचा शालेय व्यवस्थापनावरही परिणाम होतो.
4) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.
A)शिक्षक वर्गात पुरेसा वेळ घालवू शकत नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक परिणाम आणि कौशल्य विकासावर परिणाम होऊ शकतो.
B)ASER 2021 अहवालानुसार, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर कमी असल्याचे दिसून आले, ज्याचे एक कारण शिक्षकांचे अशैक्षणिक कामांचे ओझे हे असू शकते.
5) विद्यार्थी गुणवत्तेवर परिणाम.
A)विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर घसरू शकतो.
B)शाळेतील निकालात घट होऊ शकतो.
C)शाळेच्या दर्जावर आणि इमेजवर परिणाम होऊ शकतो.
D)गुणवत्तेचा आढावा घेणाऱ्या चाचण्यांमध्ये शाळा पिछाडीवर राहू शकतो.
E) शिक्षणात गुणवत्ता नव्हे तर केवळ प्रमाणित कामांचा आकडा महत्त्वाचा वाटू लागतो.
6) शिक्षक-विद्यार्थी संवादावर परिणाम.
A)अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा कमी होते.
B)शिक्षक हा केवळ ज्ञानाचा स्रोत नसून मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहे, परंतु अशैक्षणिक कामांमुळे ही भूमिका प्रभावीपणे पार पाडणे कठीण होते.
7) शिक्षकांची व्यावसायिक वाढ खुंटणे.
A)अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना स्वत:च्या व्यावसायिक विकासासाठी (उदा. प्रशिक्षण, नवीन शिकवण्याच्या पद्धती शिकणे) वेळ मिळत नाही. यामुळे त्यांच्या शिकवण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
उपाययोजना.
अशैक्षणिक कामांचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील.
1)प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
शाळांमध्ये स्वतंत्र प्रशासकीय कर्मचारी नियुक्त करावेत, जे आधार कार्ड अपडेट, मध्यान्ह भोजन व्यवस्थापन, आणि इतर प्रशासकीय कामे हाताळतील. यामुळे शिक्षकांचा शिकवण्यावर अधिक भर राहील.
2)शिक्षकांचे कार्यभार विभाजन.
शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्यासाठी कार्यभाराचे स्पष्ट विभाजन करावे. उदाहरणार्थ, 
निवडणूक कर्तव्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावेत.
3)तंत्रज्ञानाचा वापर.
प्रशासकीय कामांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ऑटोमेशनचा वापर करावा. 
उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांच्या नोंदींसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकते, ज्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचेल.
4)शिक्षक प्रशिक्षण आणि प्रेरणा.
शिक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी नियमित प्रशिक्षण, कार्यशाळा, आणि प्रोत्साहनपर पुरस्कार योजना राबवाव्यात. यामुळे त्यांचा उत्साह आणि शिकवण्याची गुणवत्ता वाढेल.
5)धोरणात्मक सुधारणा.
A)केंद्र आणि राज्य सरकारांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्यासाठी स्पष्ट धोरणे आखावीत. 
B)नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये याबाबत काही सूचना आहेत, ज्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
6)समाजाचा सहभाग.
स्थानिक समुदाय व समाज आणि पालकांना शाळेच्या काही जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी करून घ्यावे, जसे की सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन किंवा शाळेच्या देखभालीसाठी सहकार्य.
7) इतर उपाययोजना.
A)शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करणे
स्वतंत्र अशैक्षणिक कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे.
B)डिजिटल माध्यमांतून अहवाल व माहिती संकलन सुलभ करणे. 
C)शाळेतील कामाचे नियोजन शिक्षकांसोबत सल्लामसलत करून करणे.
D)गुणवत्तेच्या मूल्यांकनात अशैक्षणिक कामांचे ओझे लक्षात घेणे.
E) बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अधीक्षणिक कामासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार कार्यवाही होणे जरुरी आहे.
सकारात्मक उदाहरणे.
        उपलब्ध वेळेत व उपलब्ध परिस्थितीत शिक्षक कसलिहि तक्रार न करता आपले कर्तव्य इमानदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सतत प्रयत्न करीत असतो.
काही सरकारी शाळांनी अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा केली आहे. 
उदाहरणार्थ:
A)जालना जिल्ह्यातील श्रीरामतांडा शाळा.
येथील शिक्षकांनी स्थानिक समुदायाच्या सहकार्याने शैक्षणिक सुधारणा केल्या, ज्यामुळे 100% स्थलांतर रोखले गेले आणि पटसंख्या वाढली.
B)चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह शाळा.
ही शाळा वर्षभर अविरत सुरू राहते, आणि शिक्षकांनी अशैक्षणिक कामांचे व्यवस्थापन स्थानिक पंचायतींच्या सहाय्याने केले आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षकांचे अशैक्षणिक कामांचे ओझे हे शैक्षणिक गुणवत्तेच्या आड येणारे प्रमुख आव्हान आहे. यामुळे शिक्षकांचा शिकवण्यासाठीचा वेळ, त्यांचे मनोबल, आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम यावर नकारात्मक परिणाम होतो. प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तंत्रज्ञानाचा वापर, आणि धोरणात्मक सुधारणा यासारख्या उपाययोजनांद्वारे ही समस्या कमी करता येऊ शकते. शिक्षकांना त्यांच्या मूळ भूमिकेकडे—म्हणजेच शिकवण्याकडे—पूर्णपणे केंद्रित करण्यासाठी सरकार, स्थानिक समुदाय, आणि शैक्षणिक प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा प्रयत्नांमुळे सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.
शिक्षकांचा उपयोग केवळ प्रशासनाच्या गरजा भागवण्यासाठी न होता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणे आवश्यक आहे. शिक्षक जर शिक्षणापुरताच मर्यादित राहिला, तरच शालेय गुणवत्ता वाढू शकते. त्यामुळे सरकारी धोरणांमध्ये याबाबत गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.