गुरुवार, ३ मे, २०१८

संत तुकाराम यांचा अभंग

संत तुकोबांचा उपदेश

गाजराची पुंगी ।
तैसे नवे झाले जोगी ।।१।।
काय करोनि पठन? ।
केली अहंता जतन ।।ध्रु.।।
अल्प असे ज्ञान ।
अंगीं ताठा अभिमान ।।२।।
तुका म्हणे लंड ।
त्याचें हणोनि फोडा तोंड ।।३।।

अर्थ व चिंतन -
लहान मुलं वाजवण्यासाठी गाजराची पुंगी बनवतात. ती वाजते तोवर वाजवतात आणि काम संपलं की खाऊन टाकतात. तुकोबा म्हणतात, "गाजराच्या पुंग्या बनतात तसे नवनवीन जोगी, साधू लोक तयार तयार झाले आहेत." असं पोटासाठीं बाह्यवेशाने जोगी बनलेल्या लबाड आणि दांभिक लोकांबद्दल तुकोबा राग व्यक्त करत आहेत.

ते पुढे म्हणतात, "अहो यांनी धर्मग्रंथांचं पाठांतर करून तरी काय केलं हो? अहंकार तर अंगात जशाला तसाच राहिला." ग्रंथ नुसतेच पाठ करणाऱ्यांना फार तर 'पाठक' म्हणता येईल. पाठांतर करणाऱ्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? वाचलेल्या अक्षर-न-अक्षराचा अर्थ कळला आणि त्यानुसार वागणं घडलं तर त्याला ज्ञानी म्हणता येईल. पण या गाजराच्या पुंग्यासारखे पोटभरू तयार झालेले हे साधू म्हणजे लबाड म्हटले पाहिजे.

वाचन भरपूर आहे, पाठांतर बरचसं आहे पण सोबतच अहंकारालाही जपलं आहे, तर मग तो साधू लबाड समजावा.

नुसतंच वाचन आणि पाठांतराने ज्ञान मिळत नसतं. त्याला आकलन आणि अनुभव दोन्ही पाहिजे. पण हे गाजराच्या पुंगीसारखे तयार झालेले लोक "ज्ञानानं तर कमीच असतात, उलट यांच्या अंगात (वाचन आणि पाठांतर केल्याचा) ताठर अहंकार मात्र भरपूर असतो."

आणि म्हणून शेवटी तुकोबा म्हणतात, "अकलेनं पोकळ आणि अहंकाराने भरलेले हे जोगी, साधू लोक म्हणजे निव्वळ लबाड माणसं आहेत. म्हणून यांचं तोंड फटके हाणून फोडलं पाहिजे."

वारकरी संतांनी सांगितलेल्या लबाड साधूंच्या या खुणा आपण नीट समजून घेतल्या नाहीत. ज्यांना समजल्या त्यातल्या काहींना सोडलं तर बाकीच्यांना त्या समाजाला समजून सांगता आल्या नाही. म्हणून तर हे ढोंगी साधू लोक आपल्याला भेटतच राहतात. एक कारागृहात गेला की दुसरा मठ तयार करून तयारच असतो. दुसरा गेला की तिसरा आणि तिसरा गेला की चौथा. हे सगळं आपण आजही आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. रोज कुणी-ना-कुणी नवीन बाबा तयार झालेला वाचायला किंवा ऐकायला तर मिळेलच.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.