साधना साप्ताहिक (26 एप्रिल 2025)-
एक चिकित्सक परीक्षण.
साधना साप्ताहिकाचा 26 एप्रिल 2025 च्या विशेषांकातील मजकूर, त्याची थीम, लेखकांचे योगदान, आणि त्याचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व यांचे सविस्तर परीक्षण केले आहे.
अंकाचे मुखपृष्ठ.
या अंकाचे मुखपृष्ठ हे अत्यंत साधे असून मुखपृष्ठावरील वाचन करणारी स्त्रीची भावमुद्रा निस्तेज, हताश व नाराज दिसते.खरेतर वाचनाने ज्ञान मिळत असले व मनोरंजन होत असले तरी वाचनाचा आनंद वाचकाच्या चेहऱ्यावर नेहमीच ओसंडून वाहत असतो.मुखपृष्ठावरील स्त्री वाचताना आनंदी व उत्साही दिसली असती तर मुखपृष्ठ अधिक आकर्षक दिसले असते.
अंकाची थीम.
"दृष्टिकोन आकाराला येईपर्यंत वाचन" ही थीम या विशेषांकाला आहे.यातून वाचन दृष्टिकोन आकाराला येईपर्यंत वाचन करावे असा अर्थ निघू शकतो. दृष्टिकोन आकाराला येईपर्यंत नाही तर दृष्टिकोन अधिकाधिक विकसित व समृद्ध होईपर्यंत वाचन व्हायला हवे, आणि दृष्टिकोन विशिष्ट वयात किंवा वयाच्या विशिष्ट अवस्थेला आकाराला येईल ही धारणाच मुळात चुकीची आहे, कारण जितके अधिक वाचन होईल तितके अधिकपणे दृष्टिकोन विकसित व समृद्ध होत जातो.त्यामुळे "दृष्टिकोन समृद्ध करणारे वाचन" अशी थीम या अंकाला दिली असती तर अधिक संयुक्तिक झाले असते.
या विशेषांकाची रचना नेहमीप्रमाणे वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. या अंकात वाचन या विषयांवर लेखांचा समावेश आहे, अधिकांश लेख पंचविशीपूर्वी निर्माण झालेल्या दृष्टिकोनाविषयी भाष्य करतात.
संपादकीय दृष्टिकोन आणि सुसंगती.
या अंकातील लेखकांचे योगदानही उल्लेखनीय आहे. ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे वाचनाचा प्रगल्भ सवयी, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर नवीन दृष्टिकोन मांडले आहेत. साधनाच्या मते, “आता हे सर्व लेख एकत्र वाचल्यावर, वाचकांच्या मनात त्या सर्वांच्या आशयाची बेरीज नाही, तर गुणाकार होईल” हे विधान साधनाच्या लेखनाच्या प्रभावीपणाला अधोरेखित करते. हा अंक वाचकांचा दृष्टिकोन अधिक समृद्ध करेल व त्यांच्या विचारांना चालना देईल आणि त्यांना समाजातील बदलाचे सक्रिय भागीदार बनण्यास प्रेरित करेल.
लेखांचे सखोल विश्लेषण.
1) मिलिंद बोकील यांच्या लेखातील खरी भूक भागते ती वाचनालयामधूनच, वाचन हा लेखकाचा चारा आणि तेच त्याचे पाणी. हे अगदी मनापासून पटले. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की, वाचकाची खरी भूक भागते ती वाचनालयामधूनच, वाचन हाच वाचकाचा चारा आणि तेच त्याचे पाणी.
2) सुबोध जवडेकर यांच्या लेखात वाचनामुळे आपला दृष्टिकोन उदारमतवादी कसा होतो व वाचनामुळे सामाजिक भान आले हे लक्षात येते पण अत्यल्प वैज्ञानिक साहित्य वाचनातून वैज्ञानिक कसा येतो हे लक्षात येत नाही.
3) राजन गवस यांच्या लेखात वाचनामुळे कोणतीही गोष्ट नवीन पद्धतीने समजून घेता येतात व त्यामुळे आत्मविश्वास वाढतो हे समजले परंतु लहानपणी शिक्षकांनी बदडून बदडून हुशार कसे केले हे कळले नाही आणि ते त्यांनी समजावले पण नाही. लेखनामुळे त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
4) रूढ आणि पारंपरिक चौकटीतील साहित्य वाचल्यापेक्षा नवी माहिती व नावे ज्ञान मिळेल असे साहित्य वाचल्यास आपला दृष्टिकोन समृद्ध होतो हे समजले परंतु हिंदी साहित्य वाचल्यामुळे मराठी साहित्य वाचनाला कोणत्या मर्यादा पडतात व त्याचा आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो हे आसाराम लोमटे यांनी आपल्या लेखात स्पष्ट केले नाही.
5) ज्ञानेश्वर मुळे यांच्या लेखात वाचनामुळे जगाविषयी उत्सुकता निर्माण होते हे समजले स्वदेशातील समस्यांची जाणीव व या समस्यांबाबत उत्सुकता निर्माण का होत नाही, याबाबतचा दृष्टिकोन का समृद्ध होत नाही याबाबत लेखकाने चर्चा करायला हवी होती.
7) समिना दलवाई यांच्या लेखात दलीत साहित्य वाचनातून लेखिकेचा तयार झालेला दृष्टिकोन हा परिस्थिला अनुभवलेल्या मनस्थितीतून तयार झालेला दृष्टिकोन एकच असल्याचे जाणवले, म्हणजेच दृष्टिकोन फक्त वाचनातून तयार होत नाही तर अनुभवातूनही तयार होऊ शकतो हे समजले.विषमतेला विनोद व हिंसेला पराक्रम म्हणता येत नसले तरी लेखिकेला परिस्थितीला निरपेक्ष भावनेतून पाहण्याचा दृष्टिकोन तयार होण्यासाठी अधिक वाचनाची गरज असल्याचे जाणवले.
9) सुलक्षणा महाजन यांना शाळेत न आवडणारे विषय कॉलेज मध्ये आवडायला लागले याचा अर्थ वाचन ही समाजपूर्वक झाल्यास न आवडणारा विषय समजल्यामुळे आवडायला लागतो हे समजले.वाचनामुळे स्वतःला व इतरांना प्रश्न विचारण्याची हिम्मत तयार झाली त्याच प्रमाणे वाचनामुळे संशोधनाची मानसिकता तयार झाली हे वाचनामुळे दृष्टिकोन समृद्ध झाल्याचे लक्षण आहे, कोणतेही एकांगी साहित्य वाचनात आले तर आपला दृष्टिकोनही एकांगी तयार होतो, याप्रमाणे लेखिकेचा शहरविरोधी दृष्टिकोन तयार झाल्याचे स्पष्ट होते.
10) सानिया यांच्या लेखातून वाईट साहित्य वाचनातून वाईट दृष्टिकोन तयार होतो असा गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. वाचनामुळे तयार झालेल्या दृष्टिकोनाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो हा वाचनाचा दुष्परिणाम नाही तर विचार वेगाने पसरणाऱ्या प्रसार माध्यमाचा आहे हे अधोरेखित करणे गरजेचे होते.येथे वाचकाचा दृष्टिकोन दूषित होत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
11) सदानंद मोरे यांच्या लेखात वाचनामुळे मते मतांतरे कळतात, ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातात, वाचनामुळे लेखनाची प्रेरणा मिळते हे ही कळले परंतु वाचनामुळे काहीतरी लिहिण्याचा दृष्टिकोन कसा तयार होतो यावर लेखकाने अधिक प्रकाश टाकायला हवा होता.
13) संकल्प गुर्जर यांनी आपल्या लेखात वाचनामुळे उदारमतवाद कसा आला यावर दृष्टिकोन निर्मितीच्या अधिक भर पाहिजे होता.आवडत्या लेखकाचा दृष्टिकोन समांतर असल्यामुळे त्यातील आपल्याला नवीन काही मिळणार नाही हा समज गैरसमज जाणवतो.
14) ग्रंथवाचन, चिंतन व मनन यातून दृष्टिकोन उमलतात व जीवनात त्यांची प्रचिती येत जाते तसे ते दृढ होत जातात.वाचनामुळे मानवतावादी दृष्टिकोन तयार होऊन विकसित होत जातो हे विवेक सावंत यांनी उदाहरणासह पटउन दिले.राज्यकर्त्यांमध्ये हा दृष्टिकोन विकसित झाल्यास जगात कोणत्याही युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही हे नक्की.
15) भानू काळे यांनी आपल्या लेखात वाचनाचा निखळ आनंद किंवा मनोरंजन महत्वाचा असतो, प्रत्येक वेळी वाचनातून बोध मिळायलाच हवा असे नक्कीच नसते.रहस्य कथांतून नैतिक दृष्टिकोन तयार होतो.परंतु बालवयातील वाचनातून वैचारिक भूमिका ठरत नाही हा लेखकाचा विचार अतिशोक्ति व आधारविहीन ठरतो.दुसरीकडे बालवयात वाचलेल्या कुठे कसे वागावे?' या पुस्तकामुळे वर्तन बदल झाल्याचे लेखक मान्य करतात.वाढत्या वयात मिळणाऱ्या अनुभवातून वैचारिक भूमिकेत बदल होत जातो हा लेखकाचा दृष्टिकोन या अंकाच्या थिमला असंगत आहे.
16) विनोद शिरसाठ यांनी आपल्या लेखात वाचनामुळे निरपेक्षतावादी दृष्टिकोन तयार होऊन त्याचे रूपांतर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला हे सविस्तर मांडले.परंतु सम्यक सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण झाला हे उदाहरणासह लिहायला पाहिजे होते.वैचारिक गोंधळात कधी पडलो नाही या लेखाच्या शीर्षकावरून वाचनामुळे वैचारिक गोंधळ निर्माण होत नाही असा वाचकाचा वैचारिक गोंधळ निर्माण होऊ शकतो.
समारोप.
मला या अंकाचे परीक्षणात्मक वाचन करताना एक नवीन दृष्टिकोन मिळाला. परीक्षणात्मक वाचनात मुद्दामहून अवधान टिकवण्याचे प्रयत्न करावे लागले नाही. सहज होणारे वाचन ही काळजीपूर्वक झाले.लेखकाचा वैचारिक गोंधळ निदर्शनास आला.
‘साधना’ चा हा अंक विचारांना चालना देणारा आहे. आजच्या धावपळीच्या आणि माध्यमांच्या कमालीच्या गोंगाटाच्या काळात, साधना सारखे माध्यम खरेच आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण लेख, वाचकांचा दृष्टिकोन विकसित करणारा, आणि सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणारी दृष्टी यामुळे हा अंक केवळ वाचनीयच नव्हे, तर संग्राह्य वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा