सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

क्षमावाणी दिवस: सबको क्षमा, सबसे क्षमा.

क्षमावाणी दिवस: सबको क्षमा, सबसे क्षमा
      मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवन जगताना व्यक्तीला क्रोध, मान, माया, लोभ, तसेच प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता, इत्यादी भावना असतात. यातील क्रोध, मान, माया, लोभ हे आपल्यासाठी हानीकारक तर प्रेम, आपुलकी, स्नेह, बंधुता हे हितकारक आहे. यापैकी 'क्रोध' हा विनाशकारक आहे. आपल्या मनासारखे व अपेक्षेप्रमाणे न घडल्याने क्रोध उत्पन्न होतो. क्रोध हा क्षणिक असतो व त्यातून घातपात आपल्या हातून घडण्याची शक्यता असते तसेच दीर्घकालीन क्रोधातून वैरत्व भाव उत्पन्न होतो आणि तो व्यक्तीच्या आत्मा, शरीर, कुटुंब, समाज आणि देशासाठी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे. क्रोध, राग, संताप, यावर विजय मिळवायचा असेल तर त्याला "क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा उपाय आहे." आणि त्यामुळेच क्रोधाच्या अभावाला 'क्षमा' म्हणतात.
     क्षमा मागणे हे कमीपणाचे लक्षण आहे; मी क्षमा मागितली तर माझा पराजय झाला किंवा मी समोरच्या पेक्षा कमकुवत भासू लागतो; हे सत्य नसून याच अहंकारने आपण माफी मागत नाही. "अहंकार हे दुर्बलाचे लक्षण आहे" त्यामुळे क्षमा मागणारा हा नेहमी 'वीर' म्हणूनच संबोधला जातो. म्हणूनच म्हणतात "क्षमा विरस्य भूपषम्" करिता अहंकार सोडून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ भेदभाव न करता माफी मागितली पाहिजे व आपण इतरांनाही माफ केले पाहिजे.
     आपण कोणाला माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर कृपा करणे नव्हे तर स्वतःच्या मनावर असलेले दडपण कमी करून मनावर असलेल्या भारापासून मुक्ती मिळविने होय. माफ केल्याने नव्याने स्नेह ऋणानुबंध अंकुरण्यास सुरवात होते. जसे की साधू संत आणि यशस्वी व्यक्तींच्या स्वभावात समता, करुणा, सेवा, दया, शांती आणि संयमी भाव असतो कारण त्यांनी आपल्या स्वभावात क्षमा भाव धारण केलेला असतो. "जगातील सर्व धर्म हे माफी मागणे आणि माफ करण्याचा संदेश देतात." आपण सुद्धा क्षमा स्वभाव धारण केल्यास आपले जीवन शांती व सुखमय होईल. कारण क्षमा हा आत्म्याचा स्वभाव आहे.
जैन धर्मातील क्षमावाणी पर्व.
      क्षमावाणी दिवस हा जैन धर्मातील एक महत्त्वपूर्ण पर्व आहे, जो क्षमा मागणे आणि क्षमा करणे या मूल्यांवर आधारित आहे. हा दिवस पर्युषण किंवा दशलक्षण पर्वाच्या समाप्तीनंतर साजरा केला जातो, ज्यात जैन अनुयायी वर्षभरातील जाणीवपूर्वक किंवा अनजाणपणे झालेल्या चुका माफ करतात आणि मागतात. 'क्षमावाणी' शब्दाचा अर्थ 'क्षमेची वाणी' असा आहे, जो क्षमा याचना करण्याच्या प्रक्रियेला दर्शवतो. हा दिवस आत्मशुद्धी, अहिंसा आणि सद्भावनेचे प्रतीक आहे. जगभरातील जैन समाज या दिवशी 'मिच्छामी दुकडम' म्हणून अभिवादन करतो, ज्याचा अर्थ 'माझ्या चुका निष्फळ होवोत' असा आहे.
क्षमावाणी पर्वाचा इतिहास आणि महत्व.
      जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर महावीर स्वामींनी क्षमेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते म्हणतात की, क्षमा ही अहिंसेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे आणि ती आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गावर आवश्यक आहे. क्षमावाणी पर्व हे पर्युषण किंवा दशलक्षण पर्वाचा भाग आहे, ज्यात दहा धर्मलक्षणांचे पालन केले जाते. हे पर्व क्रोधावर विजय मिळवण्याचे आणि मनातील कटुता दूर करण्याचे साधन आहे. जैन धर्मात क्षमा ही केवळ शब्दांची नाही, तर मन, वाणी आणि कृतीतून व्यक्त होणारी भावना आहे. हा दिवस सर्व जीवांना समान मानून, वैरभाव सोडण्याची शिकवण देतो. दिगंबर संप्रदायाप्रमाणे दशलक्षण पर्व 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत असून, क्षमावाणी 6 सप्टेंबरला साजरी केली जाते. काही ठिकाणी क्षमावाणी पूजा 8 सप्टेंबरला होईल. या पर्वाचे मुख्य उद्देश हे आत्मशुद्धी, सुख-शांती आणि समाजातील सद्भाव वाढवणे आहे. हे पर्व केवळ जैनांसाठी नाही, तर सर्व धर्मांना क्षमाभावाची शिकवण देते.
क्षमावाणी दिवस साजरा करण्याची पद्धत.
         मुख्य मंत्र किंवा अभिवादन हे आहे:
1)- "खामेमि सव्व जीवे" (मी सर्व जीवांना क्षमा करतो)
2)- "सव्वे जीवा खमंतु मे" (सर्व जीव मला क्षमा करोत)
3)- "मित्ती मे सव्व भुएसु" (मी सर्वांशी मैत्रीपूर्ण आहे)
4)- "वेरं मज्झ न केनई" (मला कोणाशीही वैर नाही)
5)- "मिच्छामी दुकडम" (माझ्या चुका निष्फळ होवोत)
       हे शब्द म्हणून लोक एकमेकांना अभिवादन करतात. काही ठिकाणी सामूहिक प्रार्थना, प्रवचन आणि तपस्वींचा बहुमान केला जातो. या दिवशी उपवास किंवा आहार नियंत्रण केले जाते, ज्यात अहिंसक भोजनावर भर असतो.
क्षमावाणीचे सामाजिक आणि आध्यात्मिक लाभ.
     क्षमावाणी पर्व मनातील क्रोध, द्वेष आणि वैरभाव दूर करतो, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. हे पर्व सहनशीलता वाढवते आणि संबंध सुधारते. जैन धर्मानुसार, क्षमा ही मोक्षाच्या मार्गावरची पहिली पायरी आहे. आजच्या तणावपूर्ण जगात, हा दिवस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, कारण तो 'सबको क्षमा, सबसे क्षमा' ची शिकवण देतो.
      आनंदी राहण्यासाठी आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणे गरजेचे असते, कारण अनेक चुकांसाठी स्वतः पश्चाताप आणि त्यातूनच आत्मघात करण्यापर्यंत टोकाचे विचार आपल्या मनात येत असतात त्यासाठी प्रत्येक व व्यक्तीने क्षमाभाव धारण करणे गरजेचे आहे. क्षमा करणे व क्षमा मागण्यामुळे आपल्यावर सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे आपले मन हलके होते, मनाची प्रसन्नता वाढते, नाते संबंध सुधारतात आणि हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
       आजच्या क्षमावाणीची सुरवात स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करून करूया. क्षमावाणी दिवशीच क्षमा मागणे म्हणजे क्षमा नव्हे तर क्षमा भाव आयुष्यभरासाठी आपला स्व-भाव झाला पाहिजे.अबालवृद्ध सर्वांनी क्षमा भाव प्रसारित करण्याच्या हेतूने क्षमावाणी दिवस साजरा करणे व सर्वांनी एकमेकांशी केलेल्या चुका आणि दुखांबद्दल माफी मागण्यासाठी, क्षमा करण्यासाठी क्षमादिवस हा उपक्रम सर्व शाळांमधून राबवला जात आहे.
      क्षमावाणी दिवस हा क्षमेच्या शक्तीचे जिवंत उदाहरण आहे. हे पर्व आपल्याला शिकवते की, क्षमा करणे हे दुर्बलतेचे नाही, तर सामर्थ्याचे लक्षण आहे. वर्षभरातील चुका माफ करून, नव्या सुरुवातीची संधी मिळते. चला तर मग आपण आपल्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल माफी मागूया व माफ करूया. या पावन दिवसाच्या निमित्ताने सर्वांना म्हणतो: मिच्छामी दुकडम!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.